राहुरी (तालुका प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ब्राम्हणी (ता. राहुरी) येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज वसतिगृहातील अनाथ मुला-मुलींना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. सिंधू एज्युकेशन अँड वेल्फेअर अकॅडमी (सेवा) संचलित ‘साळवे क्लासेस’च्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
उपेक्षित घटकांची सेवा हेच ध्येय: संघर्ष साळवे
याप्रसंगी संस्थेचे संचालक संघर्ष साळवे यांनी ‘सेवा’ संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “सिंधू एज्युकेशन अँड वेल्फेअर अकॅडमी या संस्थेच्या नावाच्या आद्याक्षरांमध्येच ‘SEWA’ (सेवा) हा शब्द दडला आहे. संस्थेचे प्रवर्तक कै. मारुतीराव दौलत साळवे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन संस्था भविष्यातही उपेक्षित घटकांसाठी आपले सामाजिक कार्य अविरतपणे चालू ठेवेल.”
विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
संचालिका भारती साळवे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत साळवे क्लासेसमधील अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी स्वतःहून शालेय साहित्य दान करून या सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलला. मुलांमध्ये लहानपणापासूनच दातृत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या उपक्रमाबद्दल साळवे क्लासेसच्या वतीने सविता दिलीप पडवळ आणि सर्व विद्यार्थी व पालकांचे विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजश्री छत्रपती शाहू महाराज वसतिगृहाचे अध्यक्ष मोहन शिंदे, सचिव अनिल सावंत, वसतिगृह अधीक्षक रोहित सावंत आणि सदस्य सुरेश शेगर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे वसतिगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

