-आळंदीत इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण; कर्करोग निदान व उपचार अधिक सक्षम होणार
आळंदी (अर्जुन मेदनकर) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अचूक निदान आणि वेळेवर उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णांना त्यांच्या परिसरातच माफक दरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल, असे आश्वासन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
त्या आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे अत्याधुनिक PET-CT युनिटच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त डॉ. संजय देशमुख, डॉ. नितीन गोसावी, जिल्हा परिषद सदस्या विनया मुंगसे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, देशात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून या आजाराविरुद्ध प्रभावी लढा देण्यासाठी अचूक निदान आणि वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. उपचार उशिरा सुरू झाल्यास रुग्णांचा वेळ आणि आर्थिक भार दोन्ही वाढतात. याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोगावरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, राज्य शासन केवळ उपचारांवरच नव्हे तर कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि अत्याधुनिक उपचार सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यस्तरीय कर्करोग उपचार व्यवस्था विकसित केली जात असून महाकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आधुनिक कर्करोग उपचार सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच नागपूर येथे हाय-एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यामुळे कर्करोग निदान, उपचार आणि संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रुग्णालयाला भेट दिल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने अत्याधुनिक PET-CT मशीनसाठी निधीची मागणी केली होती. कर्करोगाच्या गांभीर्याची दखल घेत त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या यंत्रासाठी २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या अत्याधुनिक यंत्रामुळे कर्करोगाचे अचूक निदान होऊन डॉक्टरांना आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब करणे अधिक सुलभ होणार आहे. सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही या सुविधेचा लाभ होणार असून इंद्रायणी हॉस्पिटलने व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता माफक दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे. हे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असून भविष्यातही अशा सेवाकार्यास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
आमदार दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून PET-CT मशीन उपलब्ध झाले. या रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळत आहेत. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासाची सुविधा उभारणे आवश्यक असून त्यासाठी शासन आणि सेवाभावी संस्थांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा. वाढत्या कर्करोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुसज्ज कर्करोग रुग्णालयांची उभारणी ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. आमदार बाबाजी काळे म्हणाले की, इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आळंदी, खेड आणि परिसरातील हजारो रुग्णांवर प्रभावी उपचार होत आहेत. भविष्यातही रुग्णसेवेच्या माध्यमातून कर्करोगमुक्त समाज घडविण्यास या संस्थेचे मोठे योगदान राहील. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, डॉ. संजय देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयाची पाहणी करून विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली.