– रविवारची ‘TET २०२६’ परीक्षा पुढे ढकलली; ‘NEET’च्या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषद सतर्क!
– राज्यातील १,०२८ केंद्रांवरील परीक्षा स्थगित; राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र!
पुणे/मुंबई (सोनाली बडगुजर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवारी, २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ऐनवेळी पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर राज्यभरातून सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
पोलिसांनी या कारवाईदरम्यान संशयितांकडून काही साहित्य आणि प्रश्नपत्रिका जप्त केल्या. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पडताळणीसाठी बोलावून घेतले. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत संशयित इसमांकडे सापडलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि २८ जून रोजी होणाऱ्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या या प्राथमिक पडताळणीनंतर भिवंडी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या ‘NEET २०२६’ परीक्षेमधील गैरप्रकार आणि गोंधळ लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आधीपासूनच सुरक्षिततेबाबत प्रचंड सतर्क होती. संपूर्ण राज्यात एकूण १,०२८ केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार होती. मात्र, प्रश्नपत्रिका गैरप्रकाराची ही धक्कादायक लिंक समोर आल्यानंतर, “कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,” या हेतूने आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
या रॅकेटची पाळेमुळे कुठेपर्यंत पसरली आहेत? आरोपींकडे परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका कशी पोहोचली? आणि यामागे शिक्षण विभागातील किंवा परीक्षा केंद्रांवरील इतर कोणाचा सहभाग आहे का? याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना: टीईटी २०२६ परीक्षेची नवीन तारीख आणि इतर सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in) प्रसिद्ध करण्यात येईल, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.

