‘शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार हीच काळाची गरज’; बुलढाण्यात मराठा सेवा संघाचा प्रबोधन सोहळा उत्साहात!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; ‘लोकशाहीचे वास्तव’ या विषयावर व्याख्यान

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जन्मोत्सव वर्ष आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बुलढाणा येथे मराठा सेवा संघ जिल्हा बुलढाणा (दक्षिण) च्या वतीने प्रबोधनात्मक व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. “शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार आणि आजचे वास्तव” या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी महापुरुषांचे विचार अंगीकारणे हीच आजच्या काळाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले.

स्थानिक शरद कला महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विचारपीठावर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून जिजाऊ वंदना म्हणण्यात आली.

प्रमुख वक्ते धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी आपल्या व्याख्यानातून आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर अतिशय मार्मिक व रोखठोक भाष्य केले. महापुरुषांनी दिलेला समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश आजच्या तरुणाईने समजून घेणे गरजेचे असून, सोशल मीडियाच्या काळात वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष (बुलढाणा दक्षिण) शिवश्री इंजिनियर रविकांत काळवाघे यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाची ही चळवळ अशीच पुढे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत व परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रमोद टाले यांनी केले, तर प्रमुख पाहुणे दलितमित्र शिवश्री माधवराव खेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी शिवश्री अनिल अकाळ यांचीही प्रमुख उपस्थिती होती. विचारपीठावर मराठा सेवा संघाचे राज्य संघटक शिवश्री मनोहर तुपकर, जिजाऊ सृष्टी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिवमती ज्योतीताई जाधव, कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री दिनकरराव बावस्कर, कर्मवीर भाऊराव पाटील वस्तीगृह कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री गुलाबराव कडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ सृष्टी व्यवस्थापन समितीचे कोषाध्यक्ष शिवश्री अभय पाटील, इतिहास अभ्यास कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री खांडवे सर आणि प्रमोद टाले यांनी विशेष परिश्रम घेतले. शरद कला महाविद्यालयाचे प्राचार्य शिवश्री विष्णुपंत पाटील यांनी या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक शिवश्री प्रवीण मिसाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा सचिव शिवश्री विलासराव तेजनकर यांनी मानले. या सोहळ्याला जिल्ह्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version