-श्रींच्या संजीवन समाधीचे दर्शन; गोशाळेसाठी एक कोटी रुपयांच्या निधीची देवस्थानकडून मागणी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देऊन श्रींच्या संजीवन समाधीचे पूजन व दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने गोशाळेसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंदिर दर्शनानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी मंदिर परिसराची प्रदक्षिणा घालत आळंदी देवस्थानचे पदाधिकारी, आळंदी नगरपरिषदेचे प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी विविध विकासकामे, स्थानिक समस्या आणि अडचणींसंदर्भातील निवेदने सादर केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विषयांची माहिती घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.
या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, रोहिणी पवार, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, उद्योजक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपाली पानसरे, नगरसेविका अर्चना तापकीर, उज्ज्वला काळे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी श्रींच्या पालखी रथाच्या बैलजोडीचीही पूजा केली. यावेळी तुळशीराम रानवडे, सौरभ गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदने सादर करण्यासाठी माऊली मंदिरातील कारंजा मंडपात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, इंद्रायणी सेवा फाउंडेशन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही विविध मागण्यांची निवेदने त्यांच्याकडे सुपूर्द केली. रासे येथील कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी आळंदी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. हरिनामाच्या गजरात झालेल्या या स्वागत सोहळ्यात विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारीही सहभागी झाले. आळंदी देवस्थानच्या गोशाळेच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.