-माऊली मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी; घाट स्वच्छता, आरती व प्रसाद वाटपाचा उत्साह
आळंदी (अर्जुन मेदनकर) : निर्जला एकादशीनिमित्त आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने हरिनाम गजरात इंद्रायणी आरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला साधकांनी घाट परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जपली. तर माऊली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, हरिनाम सप्ताह आणि आकर्षक पुष्पसजावटीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
निर्जला एकादशीच्या निमित्ताने माऊली मंदिरात दिवसभर हरिनामाचा जयघोष घुमत होता. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रींची आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर प्रांगणात अनेक भाविकांनी पारायण करून भक्तिभाव व्यक्त केला. मारुतीबुवा गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून भाविकांना धार्मिक पर्वणी लाभली असल्याची माहिती संयोजक संकेत वाघमारे आळंदीकर यांनी दिली. दर एकादशीला आयोजित करण्यात येणारी इंद्रायणी आरती यंदाही उत्साहात पार पडली. आरतीनंतर घाटावर उपस्थित भाविकांना उपवासाचे पदार्थ आणि केळीचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी घाटावर उपस्थित राहून इंद्रायणी मातेची आरती केली. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीच्या संयोजिका अनिता झुजम, सुवर्णाताई काळे, अर्जुन मेदनकर, सरस्वती भागवत, सुरेखा काळभोर, काशीबाई अडकिने, केसरबाई कदम, अस्मिता गौर, भागीरथी भागवत, वृंदावनी सोळंके, मनीषा दापके, तारामती गौर, सावित्री घुंडरे, मुद्राका कुडके, अनिता शिंदे, विमल मुसळे, बायडा थोरवे, गोविंद ठाकूर, माऊली घुंडरे, सुयश कदम, गजानन गांडेकर आदी उपस्थित होते.