– वैष्णवी मेरत-पागोरे हिच्या आत्महत्येमुळे बारइ, हिवरा आश्रम परिसरात हळहळ!
हिवरा आश्रम, ता. मेहकर (अरूणा म्हस्के) : शेअर बाजारामध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी आणि हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मेहकर येथील बालाजी नगर भागात घडली आहे. सौ. वैष्णवी गणेश मेरत (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मृत वैष्णवीचे वडील रतन श्रीकिसन पागोरे (वय ५८, रा. बारइ, ता. मेहकर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी पतीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. दरम्यान, सासू, सासरे आणि नणंद पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
डिसेंबर २०२५ मध्ये जावई गणेश मेरत याने शेअर मार्केटमध्ये तब्बल २५ लाख रुपये गमावले. जेव्हा वैष्णवीने त्याला शेअर मार्केट खेळणे बंद करण्यास सांगितले, तेव्हा “मी काय तुझ्या बापाकडून पैसे आणले का?” असे म्हणत तिला प्रचंड मारहाण करण्यात आली आणि माहेरून ५ लाख रुपये आणण्यासाठी घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये नणंदेच्या लग्नासाठी कपडे व आंदण म्हणून आणखी पैशांची मागणी करत तिचा छळ सुरूच ठेवण्यात आला.
काही दिवसांपूर्वी आरोपींनी “शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्यासाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन ये, नाहीतर फाशी घेऊन जीव दे,” अशी धमकी वैष्णवीला दिली होती. २३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वैष्णवीने वडिलांना फोन करून रडत म्हटले, “पप्पा, काल रात्री गणेशने मला खूप मारहाण केली. १० लाख रुपये आण नाहीतर जीव दे असं म्हणत आहेत. मला आता त्यांचा त्रास सहन होत नाही, मी आता फाशी घेऊन जीव देणार आहे”. वडिलांनी फोनवर तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने फोन ठेवला. त्यानंतर काही वेळातच नातेवाइकांकडून वैष्णवीने गळफास घेतल्याची दुर्दैवी माहिती वडिलांना मिळाली.
चिमुरड्याने उघडला दरवाजा; आई लटकलेल्या अवस्थेत!
वैष्णवीने गळफास घेतल्याची माहिती मिळताच मेहकर येथे राहणाऱ्या नातेवाईकांनी तातडीने तिच्या घराकडे धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद होता. वैष्णवीचा ३ वर्षांचा मुलगा आयांश याने आतून दरवाजा वाजवल्यानंतर तो उघडला. नातेवाईकांनी आत जाऊन पाहिले असता, वैष्णवीने स्वयंपाकघरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी पोलिसांनी मृत वैष्णवीचा पती गणेश रामेश्वर मेरत, सासरे रामेश्वर गुलाबराव मेरत, सासू सौ. मीना रामेश्वर मेरत आणि नणंद मोहिनी रामेश्वर मेरत (मोहिनी जाधव, रा. मोंडाळा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ८०(२), ८५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून मुख्य आरोपी पती गणेश मेरत याला अटक केली आहे. मात्र, कारवाईची कुणकुण लागताच त्याचे आई-वडील आणि बहीण घरातून पसार झाले आहेत. पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर सुग्रीव अलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खाडे करत आहेत.

