-चिखली विधानसभा मतदारसंघातील ३ लाखांहून अधिक मतदारांची घरपोच पडताळणी; बीएलओ ३० जूनपासून घरोघरी भेटी देणार
चिखली (राजेंद्र घुबे) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने २३-चिखली विधानसभा मतदारसंघांतर्गत दि. २२ जून २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण वर्गासाठी २३-चिखली विधानसभा मतदारसंघातील १३ सहायक मतदार नोंदणी अधिकारी, ३१७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), ५७ मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक तसेच क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. मतदार नोंदणी अधिकारी राजेंद्र पोळ यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रशिक्षण वर्ग पार पडला. निवडणूक आयोगामार्फत श्री. पी. एम. साने (NLMT) यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले, तर मतदारसंघाच्या मास्टर ट्रेनर्सनी सविस्तर प्रशिक्षण दिले. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सर्व मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत.
प्रत्येक मतदाराला गणना पत्रकाच्या (EF) दोन प्रती देण्यात येतील. त्यामधील माहितीची पडताळणी करून आवश्यक तपशील भरून स्वाक्षरीसह संबंधित बीएलओकडे जमा करावयाच्या आहेत. २३-चिखली विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख १ हजार ७२० मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे (BLA) सहकार्यही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नव्या पात्र मतदारांची नोंदणी करणे अधिक सुलभ होणार आहे. मतदार याद्या अधिक अचूक व त्रुटीरहित करण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सर्व मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २३-चिखली विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक :
| टप्पा | कालावधी |
|---|---|
| अर्हता दिनांक | ०१ ऑक्टोबर २०२६ |
| तयारी, प्रशिक्षण व छपाई | २० जून ते २९ जून २०२६ |
| बीएलओमार्फत घरोघरी भेटी | ३० जून ते २९ जुलै २०२६ |
| मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण | २९ जुलै २०२६ पर्यंत |
| प्रारूप मतदार याद्यांचे प्रकाशन | ०५ ऑगस्ट २०२६ |
| दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी | ०५ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२६ |
| दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढणे | ०५ ऑगस्ट ते ०३ ऑक्टोबर २०२६ |
| अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन | ०७ ऑक्टोबर २०२६ |
– राजेंद्र पोळ
मतदार नोंदणी अधिकारी, २३-चिखली विधानसभा मतदारसंघ

