“शब्द पाळा, नाहीतर संघर्षाची नवी ठिणगी!” ; सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविम्यासाठी तुपकरांचा राज्य सरकारला इशारा

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-रुग्णालयाच्या खाटेवरून रविकांत तुपकरांची गर्जना; “शेतकऱ्यांचा उद्रेक रोखायचा असेल तर तातडीने निर्णय घ्या”

बुलढाणा (सुरेश हुसे) : “अन्नत्याग आंदोलन स्थगित करतेवेळी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचा शब्द दिला होता. हवे तर आणखी चार-पाच दिवसांचा वेळ घ्या, मात्र सरकारसोबत बैठक घेऊन कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल. महाराष्ट्रभरातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल. मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेन. एकदा बसल्यावर उठणार नाही. या आंदोलनातून होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल,” असा खणखणीत इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावलेल्या रविकांत तुपकर यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील खाटेवरून माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह पीकविमा आणि अन्य २३ मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाण्यातील निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. मात्र, दिवसागणिक तुपकर यांची प्रकृती खालावत गेली आणि त्याचवेळी राज्यभरातील शेतकऱ्यांचा संतापही उफाळून आला. अनेक ठिकाणी आंदोलनांना आक्रमक वळण लागले. एसटी बस जाळण्यापासून ते शासकीय कार्यालयांवर हल्ले, आत्मदहनाचे प्रयत्न, जाळपोळ, तलाठी कार्यालये आणि शासकीय वाहनांची तोडफोड अशा घटनांनी प्रशासन हादरून गेले. राज्यातील ग्रामीण भागात असंतोषाचा जणू स्फोटच झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच अखेर सरकारने दखल घेतली. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत तुपकर यांच्याशी चर्चा केली. कर्जमाफीसंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि सरकारला संधी देण्याच्या भूमिकेतून तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.

मात्र, या आंदोलनाची मोठी किंमत तुपकर यांना स्वतःच्या प्रकृतीने चुकवावी लागली. अन्नत्यागामुळे त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी धोकादायकरीत्या घसरली होती. किटोनचे प्रमाण वाढल्याने आणि किडनीवर परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली, तरी सरकारने दिलेला शब्द विसरू नये, अशी आठवण त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच करून दिली आहे. “शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर यावेळी संघर्ष अधिक तीव्र होईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल,” असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Share This Article
Exit mobile version