राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच भव्य मिरवणूक

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-सम्यक समन्वय समितीचे समस्त बुलढाणेकरांना सहभागी होण्याचे आवाहन

बुलढाणा (महेंद्र हिवाळे) : कोल्हापूर संस्थानचे पुरोगामी राजे, महान समाजसुधारक आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरक्षण, शेती, उद्योग तसेच अस्पृश्यता निर्मूलन क्षेत्रात ऐतिहासिक कार्य करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून २०२६ रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समिती, बुलढाणा यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

समितीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौक येथील महापुरुषांच्या पुतळ्यांपासून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक एसबीआय चौक मार्गे आयडीबीआय चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाईल. तेथे शाहू महाराजांना मानवंदना अर्पण करून मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. तसेच गरीब, वंचित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार आदी विविध समाजघटकांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना केली. त्यांच्या सामाजिक न्यायाच्या आणि समतेच्या विचारांचा जागर करण्यासाठी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बहुजन उद्धारक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती भव्य स्वरूपात साजरी व्हावी, यासाठी बुलढाणा शहरातील समस्त बहुजनवादी, पुरोगामी व समविचारी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन सम्यक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या मिरवणुकीसाठी शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि पुरोगामी संघटनांनी सहभागाचे आश्वासन दिले आहे. त्यामध्ये महाबोधी महाविहार धम्मगिरी बुलढाणा, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, शहरातील विविध बुद्ध विहार समित्या, मराठा सेवा संघ, यश सिद्धी सैनिक सेवा संघ, सम्राट आखाडा, द बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, रमाईच्या लेकी, ब्लू स्टार भीम कन्या ग्रुप, रमाई ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, लोकराजा शाहू फाउंडेशन, उबंटू उलगुलान, संवेदना प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बारा बलुतेदार महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन स्मारक समिती, मातोश्री रमाई मंडळ (सहयोग कॉलनी) तसेच शहरातील विविध समविचारी संघटना आणि बौद्ध उपासक-उपासिका संघटनांचा समावेश आहे. सम्यक समन्वय समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version