समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-चालकाला झोपेची डुलकी जीवघेणी; फॉर्च्युनर कंटेनरखाली घुसली, तिघे जखमी

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई लेनवरील चॅनेज क्रमांक ३२६/५ येथे घडली.

याप्रकरणी सय्यद आरीफ सय्यद उमर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक शेख साजेद शेख फरीद याच्याविरुद्ध किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे कुटुंबीय आणि चालक शेख साजेद हे भंडारा येथून त्यांच्या मालकीच्या फॉर्च्युनर (क्र. MH-20 HN 6768) या वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. समृद्धी महामार्गावर प्रवास सुरू असताना चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोर जात असलेल्या कंटेनरला (क्र. NL-01 AD 4981) भरधाव वेगात मागून जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी होती की फॉर्च्युनर कार कंटेनरखाली अडकली. या भीषण अपघातात डॉ. सय्यद आसीफ सय्यद उमर आणि त्यांच्या पत्नी गुलसितान सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला. तर झुनेरानबा सय्यद, अझफ सय्यद आणि चालक शेख साजेद हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(ब) आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल नागरे करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version