स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘आरआरआर’ संकलन मोहिमेला आळंदीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाचा संदेश; पर्यावरण संवर्धनाकडे महत्त्वपूर्ण पाऊल

आळंदी (अर्जुन मेदनकर) : शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनविण्याच्या उद्देशाने आळंदी नगरपरिषद आणि कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरआरआर’ (Reduce, Reuse, Recycle) संकलन मोहिमेला आळंदीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आळंदी शहरातील दिशा होरायझन्स सोसायटी, कन्सेप्ट हेरिटेज सोसायटी आणि साई समृद्धी सोसायटी या तीन प्रमुख गृहनिर्माण संकुलांमध्ये हा आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. सध्या शहरी भागात वाढता कचरा ही गंभीर समस्या बनत चालली आहे. अनेक नागरिकांच्या घरात वापरात नसलेल्या, मात्र चांगल्या स्थितीतील वस्तू मोठ्या प्रमाणात पडून असतात. अशा वस्तू अनेकदा कचऱ्यात टाकल्या जातात. या समस्येवर उपाय म्हणून आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने या संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी न वापरण्यात येणारे जुने कपडे, चप्पल-बूट, घरगुती भांडी, लहान मुलांची खेळणी, वाचून झालेली पुस्तके, शालेय बॅगा तसेच जुने फर्निचर मोठ्या प्रमाणात संकलित करून दिले.

या संकलन मोहिमेद्वारे केवळ वस्तू गोळा करण्यात आल्या नाहीत, तर नागरिकांमध्ये ‘आरआरआर’ अर्थात कमी वापर (Reduce), पुनर्वापर (Reuse) आणि पुनर्चक्रीकरण (Recycle) या संकल्पनांबाबत व्यापक जनजागृतीही करण्यात आली. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास सार्वजनिक आरोग्य कसे सुधारू शकते, स्वच्छतेचे फायदे कोणते आहेत, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती कशी करता येते आणि या प्रक्रियेमुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला कशी चालना मिळू शकते, याविषयी कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना सविस्तर माहिती दिली. या स्तुत्य उपक्रमाला आळंदी नगरपरिषदेचेही भक्कम पाठबळ लाभले. मोहिमेदरम्यान नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, सर्व नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी उपस्थित राहून नागरिकांचा उत्साह वाढविला. दिशा होरायझन्स, कन्सेप्ट हेरिटेज आणि साई समृद्धी सोसायटीतील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. या यशस्वी मोहिमेमुळे आळंदी शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
Exit mobile version