श्रीमती रत्नभागा केशवराव लोंढे कबीरबुवा यांना ‘माई माऊली’ पुरस्कार प्रदान

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-स्व. पार्वतीबाई उर्फ जिजी काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनसेवा, अन्नदान व समाजसेवेचा गौरव

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आदर्श माता स्व. पार्वतीबाई उर्फ जिजी देवराम काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा लोंढे यांच्या मातोश्री श्रीमती रत्नभागा केशवराव लोंढे कबीरबुवा यांना ‘माई माऊली’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे व काळे परिवार यांच्या वतीने मानपत्र, स्मृतिचिन्ह, साडी-चोळी, शाल, श्रीफळ, रोख रक्कम व पुष्पहार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा लोंढे, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार दीपक उर्फ ज्ञानेश्वर पाटील, सचिव अजित वडगावकर, माऊली मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ परिवारातील तुकाराम गवारी, अर्जुन मेदनकर, विलास वाघमारे, धनाजी काळे, दीपक काळे, प्रा. श्रीधर घुंडरे, सचिन काळे, बंडूनाना काळे, संकेत वाघमारे, पुष्पाताई कुऱ्हाडे, संगीता पाटील, दत्तात्रय तापकीर, ह.भ.प. सुभाष महाराज गेठे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त विणा मंडप येथे ह.भ.प. सुभाष महाराज गेठे, विश्वंभरभाऊ पाटील, गजानन गाडेकर, वासुदेव महाराज शेवाळे, ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी माऊली मंदिरात ह.भ.प. सुभाष महाराज गेठे यांची सुश्राव्य कीर्तनसेवा संपन्न झाली. मंदिरात समितीच्या वतीने महापूजा आयोजित करण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त आषाढी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना शिधावाटप करण्यात आले. तसेच हरिपाठ, भजन आणि अन्नदान महाप्रसादाचा लाभ भाविकांना देण्यात आला.

यावेळी विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा यांनी आपल्या मातोश्रींच्या कार्याचा गौरव करत भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आमच्या परिवारासाठी हा सन्मान अत्यंत हृदयस्पर्शी आणि आनंददायी आहे. आईंच्या आयुष्यातील साधेपणा, भक्तीभाव आणि समाजाभिमुख संस्कार हेच आमच्या परिवाराचे प्रेरणास्थान राहिले आहे. हा सन्मान त्यांच्या कार्याला व सेवेला मिळालेली पोचपावती आहे. यामुळे समाजसेवा व वारकरी परंपरेतील कार्य अधिक प्रभावीपणे करण्याची प्रेरणा मिळाली आहे.” प्रास्ताविक प्रकाश काळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. श्रीधर घुंडरे यांनी केले. पसायदान आणि महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता भक्तिमय व हृदयस्पर्शी वातावरणात झाली. यावेळी प्रकाश काळे म्हणाले, “जिजी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी दिलेली शिकवण, संस्कार आणि माया आपल्या सर्वांच्या मनात कायम जिवंत राहतील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. मात्र या कठीण काळात आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी दिलेला आधार आमच्यासाठी मोठे मानसिक बळ ठरला आहे. आपण आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून जिजींच्या स्मृतीस वंदन केले, ही आमच्यासाठी मोलाची बाब आहे. आपले प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद असेच कायम राहावेत.”

Share This Article
Exit mobile version