– कामात खोडा घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी; नायब तहसीलदारांचे तलाठ्यांना तात्काळ आदेश
चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील अंत्री खेडेकर ते रोहडा (तपोवन देवी) या प्रगतीपथावर असलेल्या रस्त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांना निवेदन सादर केले. दरम्यान, या मागणीची तात्काळ दखल घेत नायब तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना कामातील अडचणी दूर करून मातीकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंत्री खेडेकर ते रोहडा रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम करत असताना काही तांत्रिक व स्थानिक अडचणी येत आहेत. ‘मेरा शिवारातून’ प्रत्यक्षात नारायण विठोबा खेडेकर यांच्या शेतापासून नालीचे खोदकाम करण्यात यावे, तसेच रस्त्यावर तातडीने भराव टाकण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रस्ता निर्मितीदरम्यान पाणी वाहून जाण्यासाठी योग्य अंतरावर सिमेंट पाईप बसवणे आणि रस्त्यावर मुरूम टाकून रोलर फिरवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काम सुरू असताना काही शेतकऱ्यांनी “तुम्ही शासकीय अधिकारी नाही, ते आल्यावरच काम होईल” असे सुचवून कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणीही आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागणीची दखल घेत नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी संबंधित क्षेत्राच्या तलाठ्यांना तात्काळ सूचना दिल्या आहेत. रस्त्याच्या कामात येणाऱ्या सर्व अडचणी स्थानिक पातळीवर दूर करून, रस्त्याचे मातीकाम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
निवेदन सादर करतेवेळी संजय खेडेकर, पंजाब खेडेकर, शिवाजीराव खेडेकर, नारायण खेडेकर, उत्तम माळेकर, दगडू खेडेकर, एकनाथ खेडेकर, राहुल टाकळकर, दीपक काळंगे, सागर खरात, अनिल बबलू, विजय मोरे, आत्माराम पडघान, समाधान मोरे यांच्यासह अंतरी खेडेकर व रोडा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

