पुणे जिल्हा आरोग्य सेवेच्या शिरपेचात मानाचा तुरा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-खेड तालुक्यातील १० आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन; आयुष्यमान आरोग्य मंदिरांची उल्लेखनीय कामगिरी

आळंदी (अर्जुन मेदनकर) : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या (NQAS) सर्वेक्षणात खेड तालुक्यातील तब्बल १० आरोग्य उपकेंद्रांनी गुणवत्ता व दर्जाच्या निकषांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळविले आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने यांनी दिली.

यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या टाकळकरवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ९४.८० टक्के गुण मिळवून राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले होते. त्यानंतर आता शनिवारी (दि. २०) खेड तालुक्यातील येलवडी, बिबी, कोरेगाव बुद्रुक, औदर, कुरकुंडी, कमान, काळूस, चिंबळी आणि वराळे येथील आरोग्य उपकेंद्रांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन जाहीर करण्यात आले आहे. या घवघवीत यशामुळे खेड तालुक्यातील आरोग्य क्षेत्रात दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात असल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे.

या यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले आहे. या मूल्यांकन प्रक्रियेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Share This Article
Exit mobile version