-भगूरसह शेवगाव तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : तालुक्यातील भगूर येथील ज्येष्ठ व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संभाजी जायभाय यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे भगूरसह संपूर्ण शेवगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोळगे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते संभाजी जायभाय यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संभाजी जायभाय यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत पक्षवाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पक्ष संघटनेशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी प्रभावी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर किसान मोर्चाच्या जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपविली आहे. या निवडीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील तसेच किसान मोर्चाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. संभाजी जायभाय यांच्या निवडीबद्दल भगूर गावासह शेवगाव तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

