जानेफळ पोलिसांचा कारवाईचा धडाका!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-गावठी दारू विकणाऱ्या दोघांवर कारवाई; २० हजारांचा मुद्देमाल जप्त

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून, १९ जून रोजी वडाळी व पारखेड येथे दोन गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत त्यांच्या ताब्यातून एकूण १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जानेफळ पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. १९ जून रोजी वडाळी येथील लक्ष्मण शालीग्राम लठाड (वय ३६) याच्या ताब्यातून ७ लिटर हातभट्टी दारू, १०० लिटर गुळमिश्रित मोहा सडवा तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क), (फ) व (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पारखेड येथे करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत श्रीचंद मांगू जाधव (वय ५१) याच्या ताब्यातून १० लिटर हातभट्टी दारू, २०० लिटर गुळमिश्रित मोहा सडवा व दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा एकूण १२ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २०८/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) व (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर दोन्ही कारवाया पोलीस निरीक्षक आजिनाथ मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आल्या. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा निकम, विष्णू जगताप तसेच पोलीस अंमलदार माधव काळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत या कारवाया करण्यात आल्या. भविष्यातही अशा बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास जानेफळ पोलीस करीत असून, अवैध दारू व्यवसायाबाबत नागरिकांनी पोलिसांना गोपनीयरीत्या माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version