-गुप्त माहितीच्या आधारे कारवाई; ४८ हजार रुपयांची मोटारसायकल हस्तगत
चिखली (अंकुश पाटील) : चिखली शहरातील बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या २४ तासांत शोधून काढत चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने आरोपीला अटक केली. आरोपीकडून सुमारे ४८ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
१९ जून २०२६ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ४ जून रोजी त्यांनी त्यांची हीरो एचएफ डिलक्स (क्र. एमएच २८ बीएम ३९१३) मोटारसायकल चिखली बसस्थानकाजवळील देशी दारू गल्लीतील न्हाव्याच्या दुकानासमोर उभी केली होती. काही वेळानंतर परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही वाहन मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४२/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक अमोल गवई यांच्याकडे सोपविण्यात आला. पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आरोपी मेहकर येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. कोलारा फाट्याजवळ वाहन तपासणी सुरू असताना विनाक्रमांकाची मोटारसायकल घेऊन येणाऱ्या संशयिताला अडविण्यात आले. वाहनाची कागदपत्रे मागितल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर चेसिस व इंजिन क्रमांकाची पडताळणी केली असता ते वाहन चोरीस गेलेली मोटारसायकल असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपले नाव वसीमखान बब्बुखान (वय ३५, रा. पैनगंगा नगर, मेहकर) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने ४ जून रोजी चिखली बसस्थानकाजवळील देशी दारू गल्लीतून सदर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीसह चोरीची मोटारसायकल जप्त करून पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अमोल गवई व पोलीस कॉन्स्टेबल अजय इटावा करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील पोलीस नाईक अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सावळे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले तसेच चिखली पोलीस स्टेशनच्या पथकाने पार पाडली.

