श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास यंदा बैलजोड निवड समितीकडून बैलजोड सेवा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-रानवडे कुटुंबातील मतभेदांमुळे समितीचा निर्णय; बबनराव कुऱ्हाडे पाटील व नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांची माहिती

आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास यावर्षी आळंदीकर ग्रामस्थ बैलजोड निवड समितीच बैलजोड सेवा देणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष तथा समिती सदस्य नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाला बैलजोडी सेवा देण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थ बैलजोड निवड समितीने यंदा ही जबाबदारी स्वीकारली असून त्याबाबतचे पत्र देवस्थान समितीकडेही सादर करण्यात आले आहे. सन १९८२ पासून बैलजोड निवड समितीमार्फत ग्रामस्थांकडून अर्ज मागवून पालखी रथासाठी बैलजोडीची निवड केली जाते. यावर्षी रोटेशननुसार रानवडे कुटुंबाकडे सेवा देण्याची संधी होती. मात्र रानवडे कुटुंबामध्ये सेवा देण्याबाबत एकमत न झाल्याने व उमेश रानवडे यांनी आपला विचार प्राधान्याने करावा, अशी मागणी करत लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी समितीने सन्मानजनक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र समितीने सुचविलेला तोडगा उमेश रानवडे यांना मान्य नसल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली. यापूर्वी समितीने प्राप्त अर्जांच्या आधारे हर्षवर्धन रानवडे व तुळशीराम रानवडे यांच्या नावांची बैलजोड सेवा देण्यासाठी घोषणा केली होती. त्यावर उमेश रानवडे यांनी हरकत घेत स्वतःची बैलजोडी लावण्याचा आग्रह धरला. समितीने नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीने स्थळ पाहणी केली असता अर्जामध्ये नमूद केलेला गोठा व बैलजोडी उमेश रानवडे यांच्या ताब्यात नसल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा समितीने केला आहे. यानंतर समितीने या प्रकरणी आळंदी पोलिसांकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

रानवडे कुटुंबातील अंतर्गत वादामुळे सर्वानुमते निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पालखी सोहळ्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये, या हेतूने यावर्षी बैलजोड निवड समितीनेच बैलजोड सेवा देण्याचा निर्णय घेतल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी समितीने काही स्थानिक राजकीय हेतूने प्रेरित व्यक्ती व पदाधिकाऱ्यांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आळंदीकर ग्रामस्थ बैलजोड निवड समितीचा निर्णय देवस्थान समितीला अधिकृतरित्या कळविण्यात आल्याची माहिती बबनराव कुऱ्हाडे पाटील व नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी दिली.

Share This Article
Exit mobile version