-स्मार्ट मीटरबाबतच्या शंका, तक्रारी आणि गैरसमज दूर करण्यासाठी २० ते २२ जूनदरम्यान उपविभागनिहाय आयोजन; ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बिबी (प्रतिनिधी) : महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी जिल्ह्यात उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. लोणार येथे २२ जून रोजी आयोजित मेळाव्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागांमध्ये २० ते २२ जूनदरम्यान हे मेळावे पार पडणार आहेत. ग्राहकांनी या मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता उमेश शेंडे यांनी केले आहे.
महावितरणचे अधीक्षक अभियंता धनंजय अहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा, मेहकर, खामगाव आणि मलकापूर असे चार विभाग असून एकूण १८ उपविभाग आहेत. या सर्व १८ उपविभागांमध्ये ग्राहक समाधान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावर कार्यकारी अभियंते तर उपविभाग स्तरावर उपविभागीय अभियंते उपस्थित राहून ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. हे मेळावे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात येणार आहेत.
स्मार्ट मीटरची माहिती आणि फायदे समजावणार
मेळाव्यांमध्ये स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे, वीज वापराचे प्रभावी व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना वीज वापर, बिलाची स्थिती, देय तारखा आणि इतर महत्त्वाच्या सूचना मोबाईलवर तत्काळ उपलब्ध होतात. तसेच वीज वापराची माहिती रिअल-टाईममध्ये मिळत असल्याने ग्राहकांना स्वतःच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि ऊर्जाबचत करणे अधिक सुलभ होते. मीटर रीडिंगसाठी प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नसल्याने बिलिंग प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक बनते, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
तक्रारींचेही होणार निराकरण
स्मार्ट मीटरविषयी ग्राहकांच्या मनात असलेल्या शंका, तक्रारी आणि गैरसमज दूर करण्यासाठी संबंधित अधिकारी व तंत्रज्ञ मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. ग्राहकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महावितरणने सर्व वीज ग्राहकांना आपल्या संबंधित उपविभाग स्तरावर आयोजित ग्राहक समाधान मेळाव्यांना उपस्थित राहून स्मार्ट मीटरविषयी अचूक माहिती घेण्याचे आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

