आळेफाटा येथे ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ संस्कारक्षम उपक्रमाचा शुभारंभ

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-जय हरी माऊलीच्या नामघोषात ६ शाळांमध्ये उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक

आळंदी (अर्जुन मेदनकर) : शालेय विद्यार्थी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि संस्कारक्षम घडावेत या उद्देशाने आळंदीतून सुरू करण्यात आलेल्या ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ या उपक्रमाचा श्रीक्षेत्र आळेफाटा, आळेगाव तसेच खराबवाडी येथील शाळांमध्ये जय हरी माऊलीच्या नामघोषात उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी ह.भ.प. डॉ. सुभाष महाराज गेठे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाशतात्या काळे, ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ परिवारातील तुकाराम अण्णा गवारी, प्रा. श्रीधर घुंडरे, निघोजे शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख काळुराम येळवंडे, ह.भ.प. प्रल्हाद महाराज भोईभार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, संस्था चालक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर वस्ती (आळे), श्री ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (आळे), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा, श्री ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (आळे) तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी (ता. खेड) अशा एकूण सहा शाळांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नैतिक संस्कार आणि मूल्य शिक्षणाची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून शाळांमध्ये अशा संस्कारक्षम उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शाळा व्यवस्थापन समित्या, संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे उत्साहात स्वागत करत त्याचा स्वीकार केला. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शालेय शिक्षणासोबत संस्कारांची जोड मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ परिवारातील संतोष दिघे यांचे विशेष सहकार्य लाभले. याबद्दल परिवाराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा, संस्कारक्षम साहित्य व ग्रंथसंपदा शाळांना भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना हरिनामाच्या गजरात हरिपाठाचे वाटप करण्यात आले.

Share This Article
Exit mobile version