तुपकरांच्या उपोषणाची ठिणगी; ‘मेरा चौकी’त आंदोलनाचा भडका! पोलिसांचा वेढा तोडून शेतकऱ्यांचा रास्ता रोको!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– आता शांत बसणार नाही! मागण्या मान्य न झाल्यास थेट बैलगाडी मोर्चा- विनायक सरनाईक यांचा इशारा
– शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; चोख बंदोबस्तातही घुमल्या कर्जमुक्तीच्या घोषणा
– पाच दिवसांपासून अन्नत्याग सुरूच, पण प्रशासनाला पाझर फुटेना!

चिखली (अंकुश पाटील) : हक्काचा पीक विमा, संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस उजाडला, तरीही कुंभकर्णी झोपेत डाराडूर झोपलेल्या सरकारला अद्याप जाग आलेली नाही. सरकारच्या या निर्दयी आणि शेतकरीविरोधी धोरणाविरोधात आता ग्रामीण भागातील बळीराजा पेटून उठला असून, जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा अधिक तीव्र झाला आहे. याच संतापाचा मोठा उद्रेक आज (१९ जून) सकाळी १० वाजता चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथे पाहायला मिळाला. शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन करत महामार्गाची कोंडी केली आणि सरकारला त्याची जागा दाखवून दिली.

“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे!”, “शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे!” अशा गगनभेदी घोषणांनी ‘मेरा चौकी’चा परिसर दणाणून सोडला होता. शेतकऱ्यांचा हा संताप पाहून आधीच तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी प्रशासनाला आणि शासनाला शेलक्या शब्दांत सुनावले. ते म्हणाले, “आम्ही शेतकरी सध्या शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत, आमचा संयम पाहू नका. शासनाने जर आमच्या मागण्यांची आणि रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेतली नाही, तर पुढील काळात थेट बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरू आणि हे आंदोलन सरकारला पळता भुई थोडी करेल!”


पोलिसांचा चोख बंदोबस्त; कार्यकर्त्यांची धरपकड!

आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आंदोलनाचा वाढता जोर आणि शेतकऱ्यांचा आक्रोश रोखणे पोलिसांना कठीण झाले होते. शेवटी आंदोलन चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी नेहमीप्रमाणे बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्तात शेतकरी नेते विनायक सरनाईक, भानुदास घूबे, गणेश थुट्टे, भागवत थुट्टे, विनोद थुट्टे, विशाल थुट्टे, सुनील खेडेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना डांबून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असला, तरी ग्रामीण भागातील संतापाची ही ठिणगी आता संपूर्ण राज्यात वणवा पेटवणार, हे स्पष्ट दिसत आहे.

Share This Article
Exit mobile version