– शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक; धोरणात्मक निर्णयासाठी वेळ लागत असल्याने तुपकरांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली!
– उपोषणापूर्वी मागील महिनाभर तुपकर होते रुग्णालयात दाखल; त्यामुळे चार दिवसांतच प्रकृती चिंताजनक, वेळीच उपचार न मिळाल्यास ‘किडनी फेल’ होण्याचा धोका?
बुलढाणा / मुंबई (बाळू वानखेडे) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, त्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. सलगच्या उपोषणामुळे तुपकर यांच्या तब्येतीविषयी वैद्यकीय वर्तुळातून मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सकांचा या संदर्भातील सविस्तर वैद्यकीय अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. तसेच, त्यांनी तुपकरांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली असल्याची खात्रीशीर माहिती विश्वासनीय सूत्रांकडून हाती आली आहे.
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग चार दिवसांच्या अन्नत्यागामुळे तुपकर यांच्या शरीरातील साखरेची पातळी (शुगर लेव्हल) आणि रक्तदाब (बीपी) कमालीचे खालावले आहेत. उपोषण आणखी काही काळ सुरू राहिल्यास त्यांच्या किडनीवर याचा कायमस्वरूपी गंभीर परिणाम होऊ शकतो, किंबहुना किडनी फेल होण्याचाही मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या प्रकृतीची खालावलेली परिस्थिती पाहता त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांकडून आणि सहकाऱ्यांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. कारण, उपोषणासाठी शरीर तयार नसतानाही आणि त्यापूर्वी महिनाभर ते रूग्णालयात दाखल असतानाही त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे.
दुसरीकडे, रविकांत तुपकर यांच्या चिंताजनक प्रकृतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेली असून, त्यांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून कळते आहे. राजकारण बाजूला ठेवल्यास, एक अभ्यासू आणि आक्रमक शेतकरी नेता म्हणून मुख्यमंत्र्यांची तुपकर यांच्याविषयी नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आहे. गरजू शेतकऱ्यांना यापूर्वीच कर्जमाफी देण्यात आली असली, तरी आता ‘संपूर्ण सातबारा कोरा’ करण्याच्या महत्त्वाच्या मागणीवर सरकार सकारात्मक असून, त्यादृष्टीने एक मोठा धोरणात्मक निर्णय नजीकच्या काळात घेतला जाण्याची शक्यता आहे.
रविकांत तुपकर यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय व्हावा, अशी आंदोलकांची इच्छा असली, तरी अशा मोठ्या धोरणात्मक निर्णयांसाठी राजकीय आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुपकरांनी प्रकृतीचा विचार करता उपोषण अधिक काळ ताणणे योग्य नाही, असा सूर त्यांच्या निकटवर्तीयांकडून उमटत आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांमुळे सत्तेतील कोणतेही प्रमुख नेतृत्व अद्याप थेट मध्यस्थीसाठी समोर आले नसले, तरी पडद्यामागे यावर वेगाने हालचाली सुरू आहेत. शेतकरी नेत्याच्या प्रकृतीची काळजी सरकारलाही असून, तुपकर यांचे उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकार लवकरच काही सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत आहेत.

