साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाचे तातडीने लोकार्पण करा; रुग्णांना सुविधा उपलब्ध करून द्या

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-१८ कोटींच्या सुसज्ज इमारतीला दोन वर्षांपासून प्रतीक्षा; भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सुमारे १८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अद्ययावत ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करून ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अंकुर उल्हासराव देशपांडे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा हे सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असून पंचक्रोशीतील सुमारे ५० ते ५२ खेड्यापाड्यांचा व्यवहार या गावाशी निगडित आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने सुमारे १८ कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी सुसज्ज व भव्य अशा ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारली. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही हे रुग्णालय अद्याप कार्यान्वित झालेले नसल्याने परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. अत्याधुनिक सुविधा असलेली इमारत उभी असतानाही विविध प्रशासकीय कारणांमुळे रुग्णालय सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी, गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. या संदर्भात जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला असता, रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने तसेच शासनाकडून नवीन भरती झाल्यानंतरच रुग्णालय कार्यान्वित करता येईल, असे सांगण्यात आल्याचे देशपांडे यांनी नमूद केले आहे.

५२ गावांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न

साखरखेर्डा हे पौराणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे सुमारे २० हजार लोकसंख्येचे गाव आहे. परिसरातील ५२ खेडी व्यवसाय, बाजारपेठ, आरोग्य सेवा, शासकीय कामकाज तसेच इतर मूलभूत गरजांसाठी या गावावर अवलंबून आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या अभावामुळे नागरिकांना उपचारासाठी ६० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करावे लागत असून त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे देशपांडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कर्मचारी नियुक्ती करून लोकार्पणाची मागणी

साखरखेर्डा येथील नव्या ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी आणि आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी अंकुर देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान, या निवेदनाची दखल घेत आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून संबंधित आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय लवकरच सुरू होणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version