-शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक; सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन
देऊळगाव मही (प्रतिनिधी) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बुलढाणा येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देऊळगाव मही येथील शेतकरी व ग्रामस्थांनी पुढाकार घेत उद्या (१९ जून) बाजारपेठ बंदची हाक दिली आहे. तुपकर यांच्या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करत सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येणार असल्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या वतीने संभाजी रामराव शिगणे, मधुकर उत्तमराव शिगणे, तेजराव उत्तमराव मुंडे, यासीन शेख जुल्केकर, बबन उर्फ गबाजी निळोबा चेके, अदील पठाण, रिया सेठ (माजी सभापती), समाधान भिकाजी शिंगणे, शंकर दादा शिंगणे, प्रदीप हिवाळे आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, बाजारपेठ बंद शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पार पाडण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढेल,” असा इशारा देत देऊळगाव महीतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

