कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रविकांत तुपकर यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वारंवार मोडीत निघत असून कर्जमाफी, पीक विमा आणि नुकसानभरपाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक होत असल्याचा तीव्र संताप आज सिंदखेडराजा येथे व्यक्त करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी नतमस्तक होत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, काढण्यात आलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी नोंदली गेली. शासनाने मदत जाहीर केली, तसेच मुख्यमंत्र्यांनी पीक विम्याची घोषणा केली; परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. या अन्यायाविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलढाणा येथे अन्नत्याग उपोषण करत असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र, शासन आणि प्रशासन त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पवित्र भूमीत, सिंदखेडराजा येथील राजवाड्यात जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेसमोर राज्य सरकारने काढलेला कर्जमाफीचा जीआर ठेवून सरकारला सद्बुद्धी मिळावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी शेतकरी योद्धा कृती समिती, क्रांतिकारी शेतकरी संघटना, लोकजागर परिवार तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आज प्रश्न कोणत्या पक्षाचा नाही, तर शेतकऱ्याच्या जगण्या-मरण्याचा आहे. शेतकऱ्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे, त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या रविकांत भाऊ तुपकर यांच्या पाठीशी प्रत्येक शेतकरी ठामपणे उभा राहिला पाहिजे.” तसेच सरकारने कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये तात्काळ दुरुस्ती करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मंजूर करावा आणि रविकांत तुपकर यांच्या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. पुढील दोन ते तीन दिवसांत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. “शेतकऱ्याच्या घामाला दाम द्या, शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय द्या; अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

