ज्ञानेश्वर कारखान्यात नव्या चेहऱ्यांना संधी की पुन्हा जुन्यांचाच बोलबाला?

breakingmah Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-२१ जागांसाठी निवडणूक; १८ जूनच्या माघारीनंतरच राजकीय चित्र स्पष्ट

-तरुणांना संधी की जुन्या नेतृत्वावरच विश्वास? ज्ञानेश्वरच्या राजकारणात उत्सुकता शिगेला

शेवगाव ( बाळासाहेब खेडकर) : ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमुळे शेवगाव-नेवासा तालुक्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक जागांवर विरोधकांनी केवळ औपचारिक अर्ज दाखल केल्याने मोठ्या प्रमाणावर जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रत्यक्ष मतदानापेक्षा उमेदवारी वाटप आणि राजकीय गणितांमुळे अधिक चर्चेत आली आहे.

शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा ज्ञानेश्वर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून माजी आमदार नरेंद्र घुले पाटील आणि चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या प्रभावाखाली राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गट नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देणार की पुन्हा जुन्या व अनुभवी चेहऱ्यांवरच विश्वास ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा विविध गटांतून मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, छाननी प्रक्रियेत काही मातब्बर इच्छुकांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद झाल्याने काही जागांवर नव्या चेहऱ्यांसाठी मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. अनेक तरुण आणि नवोदित कार्यकर्त्यांनी संचालक मंडळात स्थान मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी अंतिम यादीत त्यांना स्थान मिळते की नाही, याचा निर्णय १८ जून रोजी उमेदवारी माघारीनंतरच होणार आहे. दुसरीकडे, विरोधी गटानेही काही जागांवर उमेदवार उभे करून निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे उमेदवार अखेरपर्यंत मैदानात राहणार की राजकीय तडजोडींमुळे माघार घेणार, याबाबतही सभासदांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी माघारीचा दिवस कारखान्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.

कारखान्याच्या २१ जागांमध्ये शेवगाव गट – ३, शहरटाकळी – ३, कुकणा – ३, नेवासा – २, वडाळा – २, ढोरजळगाव – २, उत्पादक सहकारी संस्था – १, अनुसूचित जाती-जमाती – १, महिला राखीव – २, इतर मागासवर्गीय – १ आणि विमुक्त भटक्या जाती-जमाती – १ अशा जागांचा समावेश आहे. ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाकडून अखेर कोणाला उमेदवारीची संधी मिळते आणि कोणाच्या पदरी नाराजी येते, याकडे कार्यकर्त्यांसह सभासदांचे लक्ष लागले आहे. “नव्या पिढीला संधी” या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की पुन्हा जुन्याच चेहऱ्यांचा दबदबा कायम राहतो, याचे चित्र १८ जूननंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर कारखान्याची ही निवडणूक केवळ संचालक मंडळाची निवडणूक नसून तालुक्यातील राजकीय ताकद आणि नेतृत्वाचीही मोठी परीक्षा मानली जात आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळविण्यासाठी वरिष्ठ नेते व पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारी यादीत कोणाला स्थान मिळते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Share This Article
Exit mobile version