आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने दुसऱ्यांदा दुकाने बंद

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाच्या अफवेने साखरखेर्ड्यात खळबळ; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : अन्न व औषध प्रशासनाचे पथक आज साखरखेर्डा येथे येणार असल्याच्या अफवेने मंगळवारी परिसरातील पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि काही हॉटेल व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली. अशा प्रकारची घटना अल्पावधीत दुसऱ्यांदा घडल्याने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धास्तीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.

यापूर्वी रविवारीही अन्न व औषध प्रशासनाचे पथक येणार असल्याची माहिती पसरताच सायंकाळी अनेक किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि हॉटेल्स तातडीने बंद करण्यात आली होती. मात्र नंतर ती केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १६ जून रोजी पुन्हा अशाच प्रकारची चर्चा परिसरात पसरली आणि अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. अचानक दुकाने बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा दुकाने सुरू करण्यात आली. मात्र काही राजस्थानी व्यावसायिकांनी आपली स्वीट मार्ट आणि इतर दुकाने नियमित सुरू ठेवत व्यवसाय सुरूच ठेवला. साखरखेर्डा परिसरात गुटखा विक्रीबाबत सातत्याने चर्चा होत असते. काही किराणा दुकानांतून अजूनही गुटख्याची विक्री होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका किराणा दुकानावर पोलिसांनी गुटखा जप्त केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. मात्र त्या कारवाईच्या स्वरूपाबाबत स्थानिक पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या भेटींना अपेक्षित गांभीर्य दिले जात नव्हते. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवायांबाबत व्यापाऱ्यांमध्ये अधिक सतर्कता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कोणत्या भागात तपासणी होणार याची माहिती आगाऊ उपलब्ध नसल्याने व्यावसायिक अधिक सावध झाले आहेत. दरम्यान, शेंदुर्जन परिसरातही एका बहुरूपी कलाकाराने पोलिस अधिकाऱ्याच्या वेशात प्रवेश केल्याची चर्चा रंगली. त्याच्या उपस्थितीमुळे काही काळ व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आणि काही दुकाने बंद झाल्याचे सांगितले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या संभाव्य कारवाईच्या केवळ चर्चेमुळेही दुकाने बंद होत असल्याचे चित्र सध्या परिसरात पाहायला मिळत असून, प्रशासनाच्या कारवाईबाबत व्यापारी वर्ग अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

Share This Article
Exit mobile version