-गुरुवारी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली मेहकरात शेतकरी आक्रोश मोर्चा
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीसह विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरणार असून, गुरुवार, दि. १८ जून रोजी सकाळी ११ वाजता मेहकर येथे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी या निर्णयातून मोठ्या संख्येने शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही कर्जमाफी नसून कर्जवसुली असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी, महाडीबीटीअंतर्गत विविध योजनांतील थकीत अनुदान तात्काळ वितरित करावे, खते व बियाण्यांचे वाढते दर कमी करावेत, सन २०२५-२६ मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, तसेच थकीत पीकविमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि वाढती महागाई आटोक्यात आणावी, यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सदर मोर्चा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयापासून स्वातंत्र्य मैदानमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाचे नेतृत्व आमदार सिद्धार्थ खरात करणार असून, यावेळी पक्ष प्रवक्त्या जयश्री शेळके, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मोर्चात मेहकर व लोणार तालुक्यातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

