-NQAS सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेची खेड तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रे राज्यात अव्वल
आळंदी (अर्जुन मेदनकर) : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्रामार्फत (NQAS) घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेची आरोग्य उपकेंद्रे गुणवत्ता व दर्जाच्या निकषांवर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आली आहेत. या यशामध्ये खेड तालुक्यातील दोन उपकेंद्रांचा समावेश झाल्याने तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या टाकळकरवाडी (ता. खेड) प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ९४.८ टक्के, तर रिहे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ९३.२९ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. या गुणवत्तेच्या आधारे ही दोन्ही उपकेंद्रे महाराष्ट्रातील सर्वोत्तम उपकेंद्रांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरली आहेत. पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. या यशामध्ये योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर, राजगुरुनगर अंतर्गत असलेल्या टाकळकरवाडी उपकेंद्राचे १४ मे २०२६ रोजी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत मूल्यांकन करण्यात आले. हे मूल्यांकन राष्ट्रीय स्तरावरील परीक्षकांनी केले. या उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रतीक्षा येडले, आरोग्य सेविका अर्चना मांजरे, आरोग्य सेवक प्रतीक गवारी, रोहन कोळपकर, आरोग्य सहाय्यक महेश दहिवळ, आरोग्य सहाय्यिका माधुरी थिगळे, तसेच सर्व आशा स्वयंसेविका आणि इतर कर्मचाऱ्यांनी मूल्यांकन प्रक्रियेसाठी अथक परिश्रम घेतले.
मूल्यांकनासाठी ग्रामपंचायत टाकळकरवाडी, सरपंच आणि सर्व सदस्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. १५ जून २०२६ रोजी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मूल्यांकनाचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर, टाकळकरवाडी यास ९४.८ टक्के गुण प्राप्त झाले असून उपकेंद्राने घवघवीत यश संपादन केले आहे. या मूल्यांकनासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. टाकळकरवाडी आरोग्य मंदिर हे आता तालुका आणि जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थांसाठी आदर्शवत ठरले असून, या यशाबद्दल परिसरातील नागरिकांनीही सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे.

