-बँकेकडून निधी उपलब्ध होताच पेमेंटला सुरुवात; ३० जूनपर्यंत सर्व थकबाकी अदा करण्याचा संचालक मंडळाचा मानस
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी किरण शेलार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यानिमित्त कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक प्रतापराव ढाकणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.
किरण शेलार यांनी यापूर्वी गंगामाई, पैठण, संजीवनी आदी अनेक सहकारी साखर कारखान्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या असून त्यांना साखर उद्योगाचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तालयाने त्यांची कार्यकारी संचालक पॅनलवर निवड केली आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे, संचालक त्र्यंबक चेमटे, आयुब शेख, मुख्य लेखाधिकारी तीर्थराज घुंगरट, शेतकरी अधिकारी अभिमान विखे, पोपट केदार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना किरण शेलार यांनी सांगितले की, केदारेश्वर साखर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामातील काही शेतकऱ्यांची थकीत देयके अदा करण्यासाठी अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, ज्येष्ठ संचालक प्रतापराव ढाकणे आणि संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी मंगळवारी सुमारे ६ कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या थकीत देयकांच्या वितरणास सुरुवात होणार आहे. तसेच बँकेकडून निधी उपलब्ध होताच टप्प्याटप्प्याने ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि इतर सर्व थकीत देयके ३० जूनपर्यंत अदा करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक आर्थिक हालचाली व बँकस्तरावरील पाठपुरावा युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. पुढील गळीत हंगामाच्या तयारीलाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून, थकीत रक्कम मिळाल्यानंतर खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

