– दगडफेकप्रकरणी ७६ जणांविरूद्ध दंगलीचे गुन्हे दाखल
– भाजपने केला पोलिसांचा निषेध, दगडफेकीस पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप
– तीन पोलिस अधिकार्यांना जिल्ह्याबाहेर पाठवा – आ. आकाश फुंडकर
खामगाव (तालुका प्रतिनिधी) – बैलपोळ्याच्या दिवशी झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी तब्बल ७६ जणांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज कडकडीत खामगाव बंद पाळला. शहरातील कायदा व सुवव्यवस्था राखण्यासाठी शहरातील चौकाचौकात पोलिसांनी कडेकोट बंदबोस्त लावला होता. या बंदमुळे शहरातील बाजारपेठेसह छोट्या मोठ्या दुकानांना टाळे दिसून आले. या दगडफेकीला पोलीस अधिकारीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार आकाश फुंडकर यांनी केलेला आहे.
बैलपोळा सणाच्या दिवशी खामगावात क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. या प्रकरणात खामगाव पोलिसांनी ७६ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या भूमिके विरोधात भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी नाराजी व्यक्त करीत, खामगाव शहर बंद करण्याचे आवाहन केले होते. त्याला आज चांगला प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासूनच खामगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच खामगाव शहरातील तीन पोलीस अधिकार्यांना गणेश उत्सवावेळी बाहेर जिल्ह्यात पाठवावे, अशी मागणी आमदार फुंडकर यांनी केली आहे.
खामगावातील शैक्षणिक संस्थांसह किरकोळ विक्रेतेही बंदमध्ये सहभागी झाले होते. मस्तान चौकासह मुख्य रस्त्यावरही शुकशुकाट होता. हिंदुत्ववादी संघटनांनी सकाळी १० वाजता शहरातून रॅली काढून निषेध नोंदवला. पोळ्याच्या दिवशी बैलांच्या छेडखानीतून दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्यात दोन्ही गटांनी तुफान दगडफेक केली होती. पोलिस या घटनेचा चुकीच्या दिशेने तपास करत असून, निरपराधांवर कारवाई करत आहे, असा आरोप नागरीक करत आहेत. सकाळी निघालेल्या रॅलीचे नेतृत्व भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी केले. गणेश मंडळे या रॅलीत सहभागी झाली होती.

