-वैद्यकीय पथक आणि पोलिस बंदोबस्ताचा अभाव; शेतकऱ्यांमध्ये संताप, तुपकरांचा सरकारला इशारा
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज (दि. १६ जून) दुसरा दिवस आहे. आंदोलन सुरू होऊन २४ तासांहून अधिक कालावधी उलटूनही प्रशासनातील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी भेट दिलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी अद्याप वैद्यकीय पथक पोहोचले नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
निवासस्थानी आंदोलनाला सुरुवात; रात्री भजनाचा कार्यक्रम
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यासह राज्यभरातून पाठिंबा मिळत असून विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देत समर्थन दर्शविले आहे. बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. काल रात्री उशिरापर्यंत आंदोलनस्थळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंदोलनाचा कालावधी वाढत असताना शेतकऱ्यांमधील असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास सरकार जबाबदार”
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना रविकांत तुपकर म्हणाले, “मी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे. मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची ही सरकारची प्रवृत्तीच आहे. माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि प्रशासनाची राहील.” तसेच पोलिस बंदोबस्त आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.
दुसऱ्या दिवशी सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी
रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची माहिती ग्रामीण भागात पोहोचल्यानंतर अनेक शेतकरी, शेतमजूर आणि महिलांनी बुलढाण्याकडे धाव घेतली आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. प्रशासनाच्या कथित उदासीनतेमुळे परिसरातील वातावरण अधिक संवेदनशील बनत असल्याची चर्चा सुरू असून, आंदोलनाबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

