मातंग कलाकारांना दरमहा मानधन देण्यात यावे; क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची शिफारस

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-बँड कलाकारांच्या दीर्घ लढ्याला यश; १ ते ३१ जुलैदरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

देऊळगाव राजा (राजेंद्र घुबे) : मातंग समाजातील वृद्ध बँड कलाकारांना शासकीय मानधन मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, हा जिल्ह्यातील बँड कलाकारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनाचा आणि शासन स्तरावरील सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या शिव लहुसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तांबे यांनी केले.

चिखली येथे दि. १४ जून रोजी आयोजित जिल्हास्तरीय बँड मालक, कारागीर आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. शिवसेनेच्या शिव लहुसेना संघटना, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बाळासाहेब देवरस विद्यामंदिर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्ती तांबे यांनी सांगितले की, १ ऑगस्ट २००३ रोजीच्या शासन निर्णयानुसार क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगावर बुलढाणा जिल्ह्यातून विजय अंभोरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आयोगाने राज्यभरातील मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर केला होता. या अहवालात एकूण ८२ शिफारसी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १४ शिफारसी अमान्य करण्यात आल्या, तर ६८ शिफारसींना ३१ डिसेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. आयोगाचे सदस्य विजय अंभोरे यांनी मातंग समाजातील कलाकारांना दरमहा शासकीय मानधन देण्याची शिफारस आयोगाच्या अहवालातील क्रमांक ५८ वर नोंदवली होती. या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबर २०११ रोजी कार्यवाही सुरू केली होती. मात्र हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहिला. शिवसेनेच्या शिव लहुसेना संघटनेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते विजय अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पात्र बँड कलाकारांनी आवश्यक कागदपत्रांसह १ जुलै ते ३१ जुलैदरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँड मालकांचे प्रतिनिधी संजय काकफळे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस बी. के. खरात, एस. एल. डोंगरे, विदर्भ संघटक दिगंबर पाटोळे, बाळासाहेब देवरस विद्यालयाचे अध्यक्ष धनंजय व्यवहारे, दादाराव महाले, गजानन गायकवाड, सोशल फोरमचे चिखली तालुकाध्यक्ष प्रदीप साळवे, शहराध्यक्ष किरण बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन पवार, संचालक राजेश पवार, विश्वनाथ महाले, सखाराम पवार, सुभाष निकाळजे, राजू नाडे, गणेश क्षीरसागर, तेजराव निकाळजे, अंबादास ससाणे, नामदेव ढगे, सचिन पवार, प्रविण कांबळे, दिनेश पारेकर, शाम साळवे, रामदास कांबळे, मुरलीधर पवार, सागर साळवे, सागर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप साळवे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन किरण बोरकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने बँड मालक, कारागीर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version