पोलीस अधीक्षकांच्या पाठोपाठ एलसीबीचे नेतृत्वही बदलले; आता अवैध धंद्यांवर घाव बसणार का?

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-संतोष मुटकुळे यांच्याकडे एलसीबीची धुरा; अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत जनतेच्या अपेक्षा उंचावल्या

शेवगाव (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच पोलीस प्रशासनात बदलांचे वारे वाहू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला असून, शेवगावचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपविण्यात आली आहे. विद्यमान एलसीबी प्रमुख किरणकुमार कबाडी यांची शिर्डी साई मंदिर सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अवैध धंदे, वाळू तस्करी, मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि संघटित गुन्हेगारीच्या मुद्द्यांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आले आहे. अशा परिस्थितीत एलसीबी हे जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधातील सर्वात प्रभावी शस्त्र मानले जाते. त्यामुळे या बदलाकडे केवळ प्रशासकीय फेरबदल म्हणून न पाहता, जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधातील नव्या मोहिमेची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. मात्र, जनतेच्या अपेक्षा स्पष्ट आहेत. एलसीबीच्या नेतृत्वात बदल झाला म्हणून परिस्थिती आपोआप बदलणार नाही. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना मिळणारे अभय, राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक पातळीवरील साटेलोटे यावर कठोर प्रहार झाला तरच या बदलाला अर्थ प्राप्त होणार आहे. संतोष मुटकुळे यांच्यासमोर आता केवळ गुन्ह्यांचा तपास करण्याचेच नव्हे, तर जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध व्यवसायांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान आहे. अवैध धंद्यांवर धडक कारवाया, गुन्हेगारांवर वचक आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कायद्याची अंमलबजावणी झाली तरच एलसीबीवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. एलसीबीच्या खुर्चीत चेहरा बदलला आहे; आता जिल्ह्यातील अवैध साम्राज्यांवर हातोडा पडतो की सर्व काही ‘जैसे थे’ राहते, याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version