– भाजपच्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पंकजांचे नाव नसल्याचाही केला गौप्यस्फोट
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुद्दामहून रखडवून ठेवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी लवकरच मार्गी लागणार आहे. शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार केली जात आहे. मात्र, या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केला. तसेच, पंकजाताई भाजप तुमचे पंख छाटते आहे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या, अशी राजकीय ऑफरही त्यांना दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा पार पडली. यावेळी बोलत असताना अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबद्दल माहिती मिटकरींनी उघड केली. आ. मिटकरी म्हणाले, की गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला आहे. ज्या पद्धतीने तिकीट द्यायचे आणि सुडाचे राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आले. आता माझ्या भगिनी पंकजा मुंडे यांच्याही लवकर लक्षात यायला पाहिजे. कारण, १२ आमदारांची यादी आहे, ती यादी राज्यपाल लवकरच मान्य करतील. मुळात राज्यपालच भाजपचे आहे. पण मला असे समजले की दुर्देवाने १२ आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचे नाव नाही. त्यामुळे आपला पक्ष प्रामाणिकपणे वाढवणार्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. रोहिणी खडसे यांना पुढचे भविष्य लवकर कळले, त्यांनी लगेच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पंकजाताईंनासुद्धा याची जाणीव असावी किंवा असेल, त्यामुळे त्यांनी पाऊल उचलावी, असे म्हणत मिटकरींनी एका प्रकारे पंकजांना थेट ऑफरच देऊन टाकली.
प्रताप सरनाईक हे जेलमध्ये जाणार होते, पण ते तर शिंदे गटात गेले. यशवंत जाधव भाजपमध्ये गेले, त्यामुळे सगळे भाजपच्या वॉशिंग पावडरमध्ये धुवून निघाले आहे. भावना गवळींनी तर शिवबंधन काढून पंतप्रधान मोदी यांना राखी बांधली आणि ईडी पिडा टळो असे म्हटले असेल. त्यापण वॉशिंग पावडरमध्ये सारख्या साफ झाल्या आहेत, अशी टीकाही मिटकरींनी केली. राज्यात शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाले आहे. सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. मविआ सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. आता ही यादी नव्याने तयार केली जात आहे. मात्र, ही यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल नवीन माहिती उघड केली आहे. ‘आता १२ आमदारांची यादी राज्यपाल लवकर जाहीर करतील. पण १२ आमदारांच्यायादीत पंकजा मुंडेंचे नाव नाही, पंकजांनी आता पावले उचलावी, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एकाप्रकारे ऑफर देऊन टाकली आहे.
—————

