साखरखेर्डा परिसरातील सर्व तलाव कोरडे; मुक्या जनावरांना पाण्यासाठी वणवण

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-पाणीसाठा मृतसाठ्यावर; अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची शक्यता, पाणी राखीव ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा परिसरातील सावंगी माळी एक व दोन प्रकल्पांसह इतर लघू व मध्यम तलावांतील पाण्याची पातळी मृतसाठ्यावर गेली असून बहुसंख्य तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे मुक्या जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. शासनाने दुष्काळाची तीव्रता ओळखून पाणीसाठा राखीव ठेवायला हवा होता. मात्र, वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्याने अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

साखरखेर्डा परिसरातील महालक्ष्मी तलावात सध्या अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावातून साखरखेर्डा व सावंगी भगत गावांना पाणीपुरवठा केला जातो. साखरखेर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी कोराडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजना सुरू करून ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. मात्र, सावंगी भगत येथे महालक्ष्मी तलावातूनच पाणीपुरवठा होत असल्याने तेथे पाणीपातळी खालावल्यामुळे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गायखेडी तलावातून राताळी व शिंदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणीपुरवठा विहिरींमधील पाणी खूपच कमी झाल्याने दोन्ही गावांना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे या गावांमध्येही पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

सावंगी माळी एक व दोन हे मोठे लघू प्रकल्प मे महिन्यातच कोरडे पडले आहेत. या तलावांमध्ये गुरे व वन्यप्राण्यांसाठीही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. या तलावांवर उमनगाव, पांग्रीकाटे, वडगाव माळी, सावंगी माळी व सावंगी वीर या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. सध्या तलावांतील विहिरींनी तळ गाठल्याने या पाचही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राजेगाव तलावात केवळ मृतसाठा शिल्लक असून या तलावातून शेंदुर्जन, राजेगाव, लिंगा, सायाळा, बाळसमुद्र, गोरेगाव व जागदरी येथे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. मात्र, तलावात पुरेसा साठा नसल्याने या गावांनाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. परिसरातील लहान पाझर तलाव तर केव्हाच कोरडे पडले आहेत. त्यामुळे महालक्ष्मी, गायखेडी, राजेगाव आणि सावंगी माळी तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version