– बुलढाण्यात उपोषणाचे रणशिंग: कर्जमुक्ती आणि पीकविम्यासाठी तुपकर आक्रमक!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : “सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी जीव गेला तरी बेहत्तर, पण या फसव्या सरकारशी तडजोड करणार नाही,” अशा शब्दांत सरकारला ललकारत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आजपासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तुपकर यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
लढ्याचे केंद्रबिंदू आणि प्रमुख मागण्या:
- सरसकट कर्जमुक्ती: कोणत्याही जाचक अटी व नियमांची ‘फिल्टरबाजी’ न करता सरसकट कर्जमाफी मिळावी.
- पीकविम्याचा जाब: पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी.
- अध्यादेशांची होळी: कर्जमाफीसंदर्भातील जाचक अटींचे सर्व शासन निर्णय (GR) तात्काळ रद्द करावेत.
राज्यात असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे
आपल्या निवासस्थानावरून या आंदोलनाची मशाल पेटवताना तुपकर यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले आहे. “शासनाची धोरणे शेतकरीविरोधी असून, या अन्यायाविरोधात गावोगावी निषेध नोंदवा,” असे आवाहन त्यांनी केले. तुपकर यांच्या आंदोलनाला पश्चिम विदर्भासह राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, विविध शेतकरी संघटनांनी या लढ्याला पाठिंबा दिला आहे.

