एल-निनोची धास्ती; राज्यावर दुष्काळाचे सावट, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-३१ ऑगस्टपर्यंत जलसाठा राखीव ठेवण्याचे आदेश; सिंचनासाठी पाणी उपसा बंद, बेकायदेशीर उपशावर कारवाईचा इशारा

मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) : मृग नक्षत्र संपत आले तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, राज्य शासनाने पाणी व्यवस्थापनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता राज्यातील धरणांमधून सिंचनासाठी दिला जाणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी १३ जून रोजी दिले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एल-निनोचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता असल्याने सर्व जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, यासाठी धरणांतील पाणीसाठा राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच यासंदर्भात जिल्हास्तरावर तातडीने कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

महत्त्वाचे शासकीय निर्णय

  • धरणांमधून शेती व सिंचनासाठी सुरू असलेली किंवा प्रस्तावित पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करण्यात येणार.
  • पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला जलसाठा अत्यावश्यक परिस्थिती वगळता इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही.
  • स्थानिक स्वराज्य संस्था, जलसंपदा विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांनी पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेणे बंधनकारक राहील.

धरणे, कालवे, नद्या आणि नाल्यांमधून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. विनापरवाना सुरू असलेल्या मोटारी, अनधिकृत पाईपलाईन्स आणि इतर साधनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा कारवायांचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. पावसाने उशीर केल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असताना आणि वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना, शासनाने पाणी व्यवस्थापनासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share This Article
Exit mobile version