-कचरा जाळण्यामुळे पंचक्रोशीत धुराचे साम्राज्य; भाविक व नागरिक त्रस्त
आळंदी (प्रतिनिधी) : आळंदी देवस्थानाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आळंदी नगरपरिषदेला सुमारे पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या जागेच्या वापरासंदर्भातील करारातील अटी व शर्तींचा भंग होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी देवस्थान प्रशासनाने मौन बाळगल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने कचरा जाळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आळंदी नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सखोल चौकशी करावी तसेच यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केळगाव येथील ग्रामस्थ संदीपभाऊ मुंगसे यांनी केली आहे. कचरा डेपोमधून निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

