जानेफळ पोलिसांची अवैध दारूवर करडी नजर!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-देशी दारूची अवैध वाहतूक करताना एकाला पकडले; २८ हजारांचा मुद्देमाल जप्त

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील जानेफळ पोलिसांची अवैध दारूविरोधात करडी नजर असून, पोलीस स्टेशन हद्दीतील मोळा ते पिंप्री माळी रोड परिसरात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना एका व्यक्तीस पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याच्या ताब्यातून सुमारे २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दि. १३ जून रोजी सकाळी करण्यात आली.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी साहिल अशोक वानखेडे (वय २४ वर्षे, रा. पिंप्री माळी, ता. मेहकर) याच्या ताब्यातून देशी दारू बॉबी संत्रा कंपनीचे सिलबंद दोन बॉक्स, ज्यामध्ये १८० मिलीच्या ९६ शिश्या असून त्यांची किंमत ७,६८० रुपये आहे, तसेच एमएच-१२-एफएन-४०२३ क्रमांकाची कथ्थई रंगाची स्कुटी, किंमत २०,००० रुपये, असा एकूण २७,६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन जानेफळ येथे अपराध क्रमांक १९६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ) व ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा अशोक निकम (ब. नं. २३१८) यांनी दिली असून, गुन्हा ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भगवान शिंदे (ब. नं. ८८३) यांनी दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन सावंत (ब. नं. ११८) करीत आहेत. ही कारवाई पोलीस स्टेशन जानेफळचे ठाणेदार अजिनाथ मोरे, हेड कॉन्स्टेबल मोहन सावंत आणि पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा निकम यांनी यशस्वीरित्या पार पाडली. अवैध दारूची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share This Article
Exit mobile version