– प्रतापराव जाधव यांना हटविल्यानंतर प्रा. नरेंद्र खेडेकर आता शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेल्याने बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून दूर करण्यात आलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या जागी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची वर्णी लागली असून, त्यांना शिवसेना निष्ठेचे फळ अखेर मिळाले आहे. एवढेच नाही तर पुढील लोकसभा निवडणुकीत प्रा. खेडेकर हेच शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार असतील, असे ठाकरे गटातील वरिष्ठस्तरीय विश्वासनीय सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे पुढील ‘सामना’ हा प्रतापराव जाधवविरुद्ध प्रा. खेडेकर यांच्यात रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कट्टर शिवसैनिक व जिल्ह्यातील बहुतांश मतदारांना खासदार जाधव यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाणे रूचलेले नाही. तसेच, प्रा. खेडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचीदेखील राजकीय ताकद मिळणार आहे. त्यामुळे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासारखा कट्टर शिवसैनिकाचा मोहरा पुढे करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. जाधव यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण केलेले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून कालच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रा. नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुखपदी छगन मेहेत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रा. आशीष रहाटे, संजय हाडे, जयसिंग जाधव, अविनाश दळवी, विधानसभा संघटकपदी अशोक इंगळे, रवी महाले, तालुकाप्रमुखपदी निंबाजी पांडव (मेहकर), महेंद्र पाटील (सिंदखेडराजा), संदीप मापारी (लोणार), ईश्वर पांडव (नांदुरा), दीपक पाटील (मलकापूर), विजय बोदडे (खामगाव), तर शहर प्रमुखपदी किशोर गारोळे (मेहकर), गजानन जाधव (लोणार), हेमंत खेडेकर (बुलढाणा), विठ्ठल जगदाळे (मलकापूर), रमेश ताडे (जळगाव जामोद), शुभम घाटे (संग्रामपूर), विजय इंगळे (खामगाव) योगेश पल्हाडे (शेगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड व मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी दौरा करत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेले होते. तर खासदार प्रतापराव जाधव यांनीही शिंदे गटासोबत जाणे पसंत केले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातून शिवसेना संपते की काय? अशी भीती निर्माण झाली होती. परंतु, प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासारख्या कट्टर व निष्ठावंत शिवसैनिकाने जिल्हाप्रमुख म्हणून जिल्ह्यात पुन्हा एकदा जोमाने शिवसेना बांधणी सुरु केली आहे. प्रा. आशीष रहाटे यांच्यासारख्या तरुणांना सोबत घेऊन त्यांनी बंडखोरांच्या मतदारसंघातच राजकीय आव्हान निर्माण केले आहे. पुढील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीची मतदारांसह निष्ठावंत शिवसैनिकदेखील आतुरतेने वाट पाहात असून, या निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर प्रा. नरेंद्र खेडेकर यांचे राजकीय आव्हान निर्माण करण्याची रणनीती शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर निश्चित झाली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. ”बंडखोरांपैकी एकालाही पुन्हा विधानसभेत व लोकसभेत पोहोचू देणार नाही”, हे यापूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठणकावलेले आहे. त्यामुळे खासदार जाधव यांना आता प्रा. खेडेकरांचा ‘सामना’ करावा लागणार आहे. तसेही, बुलढाणा लोकसभेची जागा कमळचिन्हावर लढण्याचे सूताेवाच भाजप प्रदेशाध्यक्षांनी बुलढाण्यात केले आहे. त्यामुळे प्रतापराव जाधव आता ‘कमळ’ हाती घेणार? की शिंदे गटाला मिळेल ते चिन्ह हाती घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.