– शेतकऱ्यांची लूट अजिबात खपवून घेणार नाही! ‘DAP’ खतासाठी रविकांत तुपकरांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव
– चिखलीचा खताचा कोटा वाढवा; तातडीने निर्णय न झाल्यास कृषी विभागाच्या उरावर आंदोलन छेडणार!
बुलढाणा/चिखली (बाळू वानखेडे) – ऐन पेरणीच्या तोंडावर जिल्ह्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. खरीप हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच, बाजारातून ‘डीएपी’ (DAP) आणि इतर रासायनिक खते गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवरील खतांचा साठा संपुष्टात आला असून, दिवसभर उन्हातान्हात रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. एकीकडे खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करायचा आणि दुसरीकडे हतबल शेतकऱ्यांची ‘ब्लॅक’ने विक्री करून सर्रास आर्थिक लूट करायची, हा संतापजनक प्रकार जिल्ह्यात सुरू आहे.
“खतांची रॅक लागली नाही, उद्या लागेल, परवा लागेल…” अशी शासकीय आणि थातूरमातूर उत्तरे देणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी बोलती बंद केली. बाजारात सुरू असलेल्या काळ्याबाजाराकडे कृषी विभाग डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी विनायक सरनाईक आणि डॉ. टाले यांनी केला. शेतकऱ्यांना दुप्पट दराने खते विकली जात असताना कृषी विभाग नक्की कोणाचे भले करत आहे? असा जळजळीत सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
कृषी अधिकाऱ्यांसोबत सुरू असलेल्या याच रणकंदनादरम्यान रविकांत तुपकर यांनी थेट जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्ह्यात राखीव ठेवलेला DAP खताचा ‘बफर स्टॉक’ (संरक्षित साठा) तातडीने खुला करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
यावेळी विनायक सरनाईक यांनी कृषी विकास अधिकारी अंगाईत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
- चिखली तालुक्याचा खताचा कोटा तातडीने वाढविण्यात यावा.
- शासनमान्य दरात आणि पारदर्शक पद्धतीने खतांचे वितरण व्हावे.
- खतांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा तात्काळ बिमोड करावा.
- प्रत्येक तालुक्याला मिळालेल्या खत साठ्याची माहिती जाहीर करावी.
- पुढील १५ दिवसांच्या नियमित पुरवठ्याचे ठोस नियोजन करावे.
दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर आंदोलन अटळ!
“आम्ही केलेल्या मागण्यांची प्रशासनाने दोन दिवसांत पूर्तता करावी. शेतकऱ्यांना आवश्यक ती रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, DAPचा बफर स्टॉक खुला करावा. खतांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाल्यास कृषी विभागाच्या चिखली व बुलढाणा येथील कार्यालयांवर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी!” – रविकांत तुपकर (नेते, क्रांतिकारी शेतकरी संघटना)
चिखली तालुक्याला झुकते माप द्या: विनायक सरनाईक
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत, चिखली तालुक्यातील लागवडीचे मोठे क्षेत्र पाहता डीएपी खतांचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली. इतर तालुक्यांच्या तुलनेत चिखलीला बफर स्टॉकमधून अधिक साठा द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर, चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कृषी विभागाने दिले आहे.
सोमवारपर्यंत साठा खुला करण्याचे आश्वासन; अन्यथा कार्यालयातच ठिय्या!
कृषी विकास अधिकाऱ्यांनी अखेर नमते घेत जिल्ह्यातील राखीव डीएपी साठ्यापैकी ६०० मेट्रिक टन साठा तातडीने खुला करण्याचे आश्वासन दिले आहे. चिखली आणि मेहकर तालुक्यातील तुटवडा पाहता येथील कोटा वाढवण्यासाठी वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतला जाईल आणि सोमवारपर्यंत बफर स्टॉक खुला केला जाईल, ज्यामुळे सोमवार-मंगळवारी शेतकऱ्यांना खत मिळेल, असे आश्वासन कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, प्रशासनाने दिलेल्या शब्दात फेरबदल केल्यास थेट कार्यालयातच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विनायक सरनाईक व डॉ. टाले यांनी दिला आहे.

