विशारद पूर्ण परीक्षेत नादब्रह्म संगीत विद्यालयाचा यशस्वी सूर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-तेजस नरोडे व ज्ञानेश्वरी आंधळे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; शेवगावातच संगीत परीक्षा केंद्रास मान्यता

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : तालुक्यातील प्रख्यात गायक व वारकरी भूषण हभप प्रकाशजी कातकडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या ‘विशारद पूर्ण’ (संगीत पदवी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

विद्यालयातील तेजस एकनाथ नरोडे यांनी ७०० पैकी ४९५ गुण, तर ज्ञानेश्वरी नामदेव आंधळे यांनी ७०० पैकी ५२८ गुण मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. शास्त्रीय गायन (व्होकल) विषयातील या यशामुळे नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशजी कातकडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी संगीत पदवीधर झाले असून, त्या यशस्वी परंपरेत आता तेजस नरोडे व ज्ञानेश्वरी आंधळे यांची भर पडली आहे.

दरम्यान, वारकरी भजन आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे यांनी शेवगाव येथे नादब्रह्म संगीत विद्यालयाला नवीन परीक्षा केंद्राची मान्यता दिली आहे. तसेच कातकडे गुरुजींची विद्यापीठाच्या संगीत शिक्षक (गुरु) पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे. या मान्यतेमुळे शास्त्रीय संगीत, गायन, वादन, सुगम संगीत आणि कीर्तन विषयांच्या प्रमाणपत्र परीक्षा आता शेवगावातच होत असून, पहिल्याच वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाने संस्थेचा लौकिक अधिक उंचावला आहे. नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तेजस नरोडे, ज्ञानेश्वरी आंधळे आणि हभप प्रकाशजी कातकडे गुरुजी यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे भविष्यात शेवगाव तालुक्यातून संगीत क्षेत्रात अनेक गुणवंत कलाकार घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share This Article
Exit mobile version