-उमेश रानवडे यांचे उपोषण मागे, माऊलींच्या रथास बैलजोडी सेवेची मागणी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याची सेवा उमेश रानवडे यांना मिळावी, अशी मागणी करीत कमला एकादशीदिनी महाद्वार चौकात त्यांनी बैलजोडी घेऊन उपोषण सुरू केले होते.
बैलजोडीची सेवा यावर्षी रानवडे कुटुंबाकडे आहे. यात आलेल्या अर्जांमधून बैलजोड निवड समितीने हर्षवर्धन रानवडे व तुळशीराम रानवडे यांच्या नावास संमती देऊन त्याप्रमाणे पत्र दिले होते. त्यामुळे उमेश रानवडे यांनी या सेवेची संधी कुटुंबास मिळावी, अशी आग्रही मागणी करत उपोषण सुरू केले होते. अखेर दुपारी चार वाजता बैलजोड निवड समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, विलास घुंडरे पाटील, रामदास भोसले, शिवाजीराव रानवडे, ज्ञानोबा वहिले, माजी अध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, व्यवस्थापक माऊली वीर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्या उपस्थितीत संवाद व चर्चा झाली.
यावेळी पुढील ४८ तासांत बैठक घेण्याचे निश्चित करून या कालावधीत सन्माननीय तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उमेश रानवडे यांनी जलपेय घेऊन आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान, आळंदीकर ग्रामस्थ, बैलजोड निवड समिती आणि देवस्थान यांच्याकडून झालेल्या पत्रव्यवहाराबाबत संबंधित पत्रे आळंदी पोलीस स्टेशन आणि आळंदी देवस्थान यांना देण्यात आली आहेत. या बैठकीदरम्यान उमेश रानवडे यांनी आपल्या बैलजोडीला पालखी रथाच्या सेवेसाठी संधी मिळावी, अशी मागणी कायम ठेवत संवाद साधला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुसंवाद साधून उपोषण शांततेत मागे घेण्यासाठी प्रयत्न केले व जलपेय देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

