बळीराजा खवळला! सरकारच्या फसव्या ‘जीआर’ची जळगाव जामोदमध्ये होळी; रविकांत तुपकरांचा अधिकाऱ्यांना कपडे काढून ठोकण्याचा सज्जड दम!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– उद्योगपतींचे १६ लाख कोटी माफ, मग शेतकऱ्यांची फसवणूक का?; तुपकरांचा सरकारवर घणाघाती हल्ला; प्रशासनाचे धाबे दणाणले!

जळगाव जामोद/बुलढाणा (बाळू वानखेडे) : राज्यातील मायबाप शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारच्या जुमलेबाज कर्जमाफीचा आज (दि.11) जळगाव जामोदमध्ये अक्षरशः भडका उडाला. शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करणाऱ्या आणि जाचक अटींच्या जोखडात बांधणाऱ्या या कर्जमाफीच्या सरकारी ‘जीआर’ची क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी थेट होळीच केली. बळीराजाच्या गगनभेदी घोषणांनी जळगाव शहराचा कोपरा न् कोपरा दणाणून गेला, तर तुपकरांच्या रौद्ररूपामुळे प्रशासनाचे मात्र चांगलेच धाबे दणाणले होते.

तहसील कार्यालयावर धडकलेल्या उग्र मोर्चानंतर रविकांत तुपकर यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणाचे अक्षरशः वाभाडे काढले. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक आहे. जाचक अटींचे कुंपण घालून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या अटींमुळे राज्यातील १० ते १५ टक्के शेतकरी देखील पात्र ठरणार नाहीत. एकीकडे मूठभर धनदांडग्या उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज कसल्याही अटींविना माफ करायचे आणि दुसरीकडे राबराब राबणाऱ्या बळीराजाला मात्र अटी-शर्तींच्या जाळ्यात अडकवून ठेवायचे, हा भयंकर दुजाभाव आता महाराष्ट्राचा शेतकरी मुकाट्याने सहन करणार नाही, असा घणाघात तुपकरांनी केला.

यावेळी तुपकरांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि नफेखोर पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट त्यांच्याच भाषेत ‘समज’ दिली.

“पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी तातडीने ऐकून घ्या, सुनावण्या घ्या आणि विमा कंपनीच्या नरड्यात हात घालून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून द्या. अहवाल शासनाला पाठवून न्याय द्या, अन्यथा एकेकाला कपडे काढून भर चौकात ठोकेन!”

असा सज्जड दमच तुपकरांनी दिला. त्यांच्या या आक्रमक स्टाईल पवित्र्यामुळे बथ्थड प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली होती आणि तहसील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शेतीमालाचे भाव पाडून आणि सोयाबीन-कापसाला कवडीमोल भाव देऊन सरकार बळीराजाला देशोधडीला लावत आहे. यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला असून, सरसकट कर्जमुक्ती ही कोणाची मेहरबानी नसून ती सरकारची जबाबदारीच आहे, असे तुपकर यांनी ठणकावून सांगितले.

“शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या सरकारने चुकूनही करू नये. गावगाड्यातील शेतकरी एकदा का खवळला, तर या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण सातबारा कोरा करणे आणि हक्काचा पीकविमा मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा एल्गार पुकारत तुपकरांनी राज्यव्यापी संग्रामाचे रणशिंग फुंकले आहे. येत्या काळात हा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे.

Share This Article
Exit mobile version