माऊली पालखी सोहळ्यात रानवडे घराण्याकडे बैलजोडीचा मान

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-हर्षवर्धन रानवडे व तुळशीराम रानवडे यांच्या बैलजोडीची निवड; बैलजोड निवड समितीचे देवस्थानला पत्र

आळंदी (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांतर्गत आषाढी वारीमध्ये श्रींचा रथ ओढण्याचा मान यंदा स्थानिक रानवडे घराण्यातील हर्षवर्धन प्रदीप रानवडे आणि तुळशीराम ज्ञानोबा रानवडे यांच्या बैलजोडीला मिळाला आहे. याबाबत बैलजोड निवड समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप तसेच प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांना पत्राद्वारे निर्णय कळविला आहे.

यावर्षी रोटेशन पद्धतीनुसार रानवडे घराण्याकडे बैलजोडीचा मान देण्याची वेळ आली होती. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर निवड समितीने हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे यांच्या बैलजोडीची निवड निश्चित केली. त्यानुसार संस्थान कमिटीला अधिकृत पत्र देण्यात आले असून संबंधित मानकऱ्यांनाही निवडीबाबत कळविण्यात आले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान आळंदी ते फलटण आणि फलटणहून परतीच्या प्रवासात आळंदीपर्यंत हर्षवर्धन रानवडे यांची बैलजोडी सेवा बजावणार आहे. तर फलटण ते पंढरपूर आणि पंढरपूर ते फलटण या टप्प्यात तुळशीराम रानवडे यांची बैलजोडी रथसेवेत सहभागी होणार आहे. याबाबत माहिती देताना बैलजोड निवड समितीचे सदस्य तथा माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले की, दोन्ही मानकऱ्यांनी निवडीचे पत्र स्वीकारून सेवेसाठी आपली संमती दर्शविली आहे. निवडीचे पत्र प्रदान करताना बैलजोड निवड समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, विलास घुंडरे पाटील, रामदास भोसले, ज्ञानोबा वहीले, सचिन रानवडे, तुळशीराम रानवडे आणि हर्षवर्धन रानवडे उपस्थित होते. यावेळी पालखी सोहळ्यातील या मानाच्या सेवेबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.

Share This Article
Exit mobile version