साखरखेर्डा ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत जाहीर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-७ सदस्यीय ग्रामपंचायतीसाठी वार्डनिहाय आरक्षण निश्चित; सोडतीकडे नागरिकांची अल्प उपस्थिती

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी वार्डनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. सरपंचपदाची आरक्षण सोडत यापूर्वीच पार पडल्यामुळे सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीवेळी नागरिकांची उपस्थिती अत्यल्प होती.

गावाच्या विकासाचा कणा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या वार्डातील विकासकामांसाठी कितपत कार्यरत आहेत, याचा लेखाजोखा मतदार पुढील निवडणुकीत घेत असतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अत्यंत महत्त्वाच्या निवडणुका मानल्या जातात. साखरखेर्डा ही १७ सदस्यांची तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून, प्रत्येक वार्डात सुमारे १,८०० मतदार आहेत. गावाचा कारभार सांभाळणारे प्रतिनिधी निवडताना योग्य व्यक्तीची निवड होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित दिवटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. जी. मालोकार यांची आरक्षण सोडतीसाठी नियुक्ती केली होती. त्यांनी चक्राकार पद्धतीने वार्डनिहाय आरक्षणाचे जाहीर वाचन केले.

वार्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

वार्ड क्रमांक १

  • सर्वसाधारण
  • अनुसूचित जाती महिला
  • सर्वसाधारण महिला

वार्ड क्रमांक २

  • नामाप्र (ना. मा. प्र.)
  • सर्वसाधारण
  • अनुसूचित जाती महिला

वार्ड क्रमांक ३

  • नामाप्र (ना. मा. प्र.)
  • सर्वसाधारण
  • सर्वसाधारण महिला

वार्ड क्रमांक ४

  • सर्वसाधारण
  • सर्वसाधारण महिला

वार्ड क्रमांक ५

  • सर्वसाधारण
  • सर्वसाधारण महिला
  • नामाप्र महिला

वार्ड क्रमांक ६

  • अनुसूचित जाती
  • सर्वसाधारण
  • सर्वसाधारण महिला

आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला सरपंच ज्योती अमित जाधव उपस्थित होत्या. मात्र, मागील कार्यकाळातील इतर सदस्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. यावेळी दिलीप बेंडमाळी, चंद्रशेखर शुक्ल, संदीप खिल्लारे, बाबा तिवारी, शुभम राजपूत, अमित जाधव, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने या आरक्षण सोडतीमुळे इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version