साखरखेर्डा येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा कारभार ढेपाळला

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वीजपुरवठा सुरळीत करून कामात हयगय करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाईची मागणी; भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

साखरखेर्डा ३३ केव्ही उपकेंद्राअंतर्गत तब्बल ५२ गावे येतात. या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्या, फिडर, डीपी, ट्रान्सफॉर्मर, वायरिंग आणि इतर वीज यंत्रणेची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांकडून ही कामे प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे किरकोळ पाऊस किंवा वारा आला तरी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून प्रत्यक्षात कामे न करता किंवा अपूर्ण कामे करून कागदोपत्री देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे दाखवत लाखो रुपयांची बिले काढून घेत असल्याची तीव्र भावना जनतेमध्ये असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीसाठीचे सिंचन, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रलंबित दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच २०२० पासून उपकेंद्रांतर्गत झालेल्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांची चौकशी करून शासन निधीचा अपव्यय झाला आहे का, याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले यांच्यामार्फत हे निवेदन सादर करण्यात आले असून, त्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित अधीक्षक अभियंत्यांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.

Share This Article
Exit mobile version