-भरोसा येथील ‘खडक डोह’ रस्ता मोकळा; तहसील प्रशासनाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा दीर्घकाळचा वाद मिटला
चिखली (अंकुश पाटील) : महाराष्ट्र शासनाने शेतरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चिखली तालुक्यातील भरोसा येथील दहा वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘खडक डोह’ शेतरस्ता अखेर खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसाठीची वाहतूक अधिक सुलभ झाली आहे.
शेतरस्ता हा केवळ ये-जा करण्याचा मार्ग नसून शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाचा कणा मानला जातो. भरोसा येथील गट क्रमांक ३३३ ते २३९ दरम्यान जाणारा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा आणि १२ फूट रुंदीचा शेतरस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. चिखली तहसील कार्यालयावर मोठा प्रशासकीय ताण असतानाही तहसीलदार विजय सवडे यांनी या प्रकरणात पुढाकार घेत दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये सामंजस्य निर्माण केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ९ जून रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा रस्ता अधिकृतपणे खुला करण्यात आला. संदीप पाटील, गणेश घुबे, अमोल थुटटे, संदीप बाबुराव थुटटे, विशाल थुटटे, सागर कवळे, देवेंद्र चेके, अभिमन्यू थुटटे आणि विशाल कवळे यांनी शेतरस्ता खुला करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने आवश्यक कार्यवाही केली. या कारवाईवेळी तहसीलदार विजय सवडे, भूमी अभिलेख विभागाचे आर. टी. आंधळे, पाटील साहेब, मंडळ अधिकारी पी. एन. पाटील, तलाठी सुरेश जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे, सरपंच मल्लू हाटकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष केशवराव जी. पाटील, ज्ञानेश्वर सदाशिव थुटटे, अंबादास त्र्यंबक थुटटे, अमोल एकनाथ थुटटे, संदीप बाबुराव थुटटे, विशाल थुटटे, देवेंद्र चेके, पवन शेटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
संवादातून मिटला दशकभराचा वाद
तहसील प्रशासनाने थेट घटनास्थळी जाऊन संबंधित शेतकऱ्यांना उपस्थित केले. यावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार विजय सवडे यांनी संयमाने व योग्य मार्गदर्शन करून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये संवाद घडवून आणला. परिणामी, तब्बल दहा वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटला आणि जेसीबीच्या साहाय्याने शेतरस्ता तात्काळ मोकळा करण्यात आला.
शेतरस्ता म्हणजे शेतकऱ्यांची जीवनरेखा
पेरणी, खते व बियाण्यांची वाहतूक, औषध फवारणी, कापणी तसेच उत्पादन बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी योग्य शेतरस्ता अत्यंत आवश्यक असतो. रस्ता नसल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि शेतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. अनेकदा उत्पादन वेळेत बाजारात पोहोचत नसल्याने दरातही फटका बसतो. भरोसा येथील हा शेतरस्ता खुला झाल्याने आता शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, यंत्रसामग्री आणि उत्पादनांची वाहतूक सुलभपणे करता येणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचविणेही अधिक सोपे होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

